स्वतः झिजून इतरांना सुगंध देणारे चंदन : शेख सलीम खुर्शीदमियाँ
*समर्पण, संस्कार आणि सेवाभावाचा गौरवमय प्रवास.
"शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून समाज घडविणारा शिल्पकार असतो." आपल्या जवळपास चार दशकांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि कर्तृत्ववान सेवेतून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पदोन्नत मुख्याध्यापक शेख सलीम खुर्शीदमियाँ.
दि. ७ जून १९६८ रोजी नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे त्यांचा जन्म झाला. साधेपणा, कष्ट, प्रामाणिकपणा आणि संस्कारांचा वारसा लाभलेल्या या मातीतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिलिंद विद्यालय, कुंडलवाडी येथे झाले. सन १९८४ मध्ये दहावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवून त्यांनी शाळेच्या टॉप टेनमध्ये स्थान मिळविले.
पुढे त्यांनी शासकीय अध्यापक विद्यालय, धर्माबाद येथून डी.एड. पूर्ण केले. नोकरी करतानाही त्यांनी ज्ञानार्जनाची साधना अखंड सुरू ठेवत बी.ए., एम.ए. आणि बी.एड. या पदव्या संपादन केल्या.
त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग म्हणजे १ जानेवारी १९८५ रोजी वडिलांचे झालेल्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन. आई, सहा भाऊ आणि एका बहिणीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह, भावंडांचे शिक्षण आणि स्वतःचे शिक्षण यांचा समतोल साधत संघर्षाला धैर्याने सामोरे गेले.
दि. ८ ऑगस्ट १९८६ हा दिवस त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण ठरला. याच दिवशी डी.एड.चा निकाल लागला आणि त्याच दिवशी मिलिंद प्राथमिक शाळा, कुंडलवाडी येथे शिक्षक म्हणून रुजू होण्याचा मान त्यांना मिळाला.
सन १९९५ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन सुपुत्र आणि एक कन्या आहे. त्यांची कन्या डॉक्टर असून जावईदेखील डॉक्टर आहेत, तर दोन्ही सुपुत्रांनी एम. फार्मसीचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.
दि. ८ डिसेंबर १९८६ रोजी जिल्हा परिषद सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी मिलिंद प्राथमिक शाळा, वानोळा, डोंगरगाव, मोकळी थडी येथे सावळी येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले व कासराळी, बाळापूर आणि अर्जापूर येथे पदोन्नत मुख्याध्यापक पदांवर कार्य करत प्रत्येक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या कार्याची दखल घेत १९९८ मध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी, २००४ मध्ये पदवीधर शिक्षक पदोन्नती, २०११ मध्ये पदोन्नत मुख्याध्यापक पद आणि सन २०२६ मध्ये चटोपाध्याय कालबद्ध पदोन्नती वेतनश्रेणी त्यांना प्राप्त झाली. सन २०२४ मध्ये केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीची संधी मिळूनही गाव, शाळा, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांवरील प्रेमामुळे त्यांनी ती नाकारली.
मुख्याध्यापक म्हणून त्यांनी वृक्षारोपण, विद्यार्थी बँक, विद्यार्थी वाचनालय, शैक्षणिक सहली, स्वयंशासन दिन, प्रवेशोत्सव, ज्ञानदिंडी, ग्रामसभा, पालकसभा, प्रभातफेरी, आनंददायी शनिवार, वाचन कट्टा, अभ्यासिका, स्वाध्याय, गृहपाठ, विविध सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम यशस्वीपणे राबविले.
शाळाबाह्य आणि वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीद्वारे गंभीर आजार असलेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पाठविण्याचे संवेदनशील कार्यही त्यांनी केले.
कराटे, योग प्रशिक्षण, राष्ट्रीय एकता दौड, महिला दिन कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक मूल्ये रुजविली.
उत्कृष्ट पटनोंदणी, गुणवत्ता विकास अभियान, साक्षरता अभियान, जनगणना, कुटुंब कल्याण, हरित सेना, "माझी शाळा सुंदर शाळा" आणि विज्ञान प्रदर्शनातील जिल्हास्तरीय पुरस्कारांसह अनेक सन्मानांनी त्यांच्या कार्याचा गौरव झाला.
कोविडच्या काळात अर्जापूर येथे त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. लोकसहभागातून निधी, शैक्षणिक साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी शाळांच्या विकासाला नवी दिशा दिली.
त्यांच्या हातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, अभियंते, शिक्षक, अधिकारी, समाजसेवक, उद्योजक आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून समाजात यशस्वीपणे कार्यरत आहेत. हीच त्यांच्या आयुष्यभराच्या ज्ञानसेवेची खरी कमाई आहे.
माझ्यासाठी शेख सलीम सर हे केवळ वरिष्ठ मुख्याध्यापक नसून मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. सावळी आणि अर्जापूर येथे त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी लाभल्याने त्यांच्या कार्यतत्परतेचा, माणुसकीचा आणि सहकार्याच्या भावनेचा जवळून अनुभव घेता आला. त्यांच्या सहकार्यामुळेच माझ्या स्वतःच्या निवासाची इमारत उभारण्याचे स्वप्न साकार झाले, हे मी आयुष्यभर विसरणार नाही.
शिक्षकी सेवेसोबतच त्यांनी शिक्षक पतसंस्थेचे तब्बल १५ वर्षे चेअरमन म्हणून यशस्वी नेतृत्व केले. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे बिलोली तालुक्याचे पहिले अध्यक्ष म्हणून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य केले.
अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि सहकारी शिक्षक यांच्याशी त्यांनी सदैव प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि आपुलकीने वागण्याचा आदर्श घालून दिला. संपूर्ण सेवाकाळात कोणतेही व्यसन न ठेवता, प्रामाणिकपणा, सचोटी आणि निस्वार्थ सेवाभावाने त्यांनी आपली सेवा यशस्वीपणे पूर्ण केली.
आज ते सेवामुक्त होत असले तरी त्यांच्या कार्याचा प्रवास येथे थांबत नाही. त्यांनी लावलेली ज्ञानाची रोपे आज विशाल वटवृक्ष बनली आहेत. त्यांच्या हातून घडलेले विद्यार्थी समाजाच्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असून, हेच त्यांच्या आयुष्यभराच्या ज्ञानयज्ञाचे खरे फलित आहे.
"एखादा शिक्षक निवृत्त होतो, पण त्याने दिलेले ज्ञान, संस्कार आणि प्रेरणा कधीच निवृत्त होत नाहीत."
पदोन्नत मुख्याध्यापक शेख सलीम खुर्शीदमियाँ यांना त्यांच्या प्रदीर्घ, निष्कलंक, कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी सेवेसाठी शतशः प्रणाम, कृतज्ञ अभिवादन आणि निरोगी, आनंदी, समाधानी व दीर्घायुषी जीवनासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
शब्दांकन :
✍️ बालाजी पदमिनबाई लच्छागोड गेंदेवाड
(पर्यावरण प्रेमी शिक्षक, जिल्हा परिषद हायस्कूल, लोहगाव, ता. बिलोली, जि. नांदेड.)
मो. ९८६०३९३७०६








