१३ ऑगस्ट २०२५

अवयवदान जीवन देणारा संकल्प - प्रा. डॉ. गोविंद चौधरी

 अंगदान – जीवनदानाचा संकल्प : पानसरे महाविद्यालयात प्रेरणादायी उपक्रम





अर्जापूर, ता. बिलोली –

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या "अंगदान जीवन संजीवनी अभियान" या जनजागृती उपक्रमांतर्गत दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे एक प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यभर चालणाऱ्या या अभियानाचा उद्देश समाजात अवयव दानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.


या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय, बिलोली येथील औषध निर्माण अधिकारी एकलारे,  समुपदेशक दिनेश तळणे व सुंदर चव्हाण यांनी महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना अंगदानाचे सामाजिक, वैद्यकीय व नैतिक महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “एक व्यक्तीचा अवयव दानाचा संकल्प आठ जणांना नवजीवन देऊ शकतो. मृत्यूनंतरही आपले अस्तित्व इतरांच्या श्वासात, हृदयाच्या ठोक्यात जिवंत राहू शकते, यापेक्षा मोठा परोपकार नाही.” त्यांनी विद्यार्थ्यांना ‘नोटो’ (राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था) अंतर्गत नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आणि अंगदानातील वैधानिक बाबींचा ऊहापोह केला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गोविंद चौधरी होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. चौधरी म्हणाले, “अवयवदान ही केवळ एक कृती नाही, तर ठी जीवनाला नवसंजीवनी देणारी देणगी आहे. देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर अवयवदानाची टक्केवारी अद्याप अपुरी आहे. आपण सर्वांनी पुढाकार घेऊन हा संकल्प व्यापक करायला हवा. आपल्या एका निर्णयाने अनेक घरांमध्ये आनंदाचे दिवे पुन्हा पेटू शकतात.” त्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित प्राध्यापकांना अंगदानासाठी खुले आवाहन करत ‘नोटो’ अंतर्गत त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन केले.


याप्रसंगी हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. देविदास जाधव यांनीही अंगदानाचा संदेश अंतःकरणात रुजवून तो कृतीत उतरविण्याचा निर्धार करणे गरजेचे असे मत व्यक्त केले.  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, प्राध्यापकांचे प्रोत्साहन आणि आरोग्य विभागाचे मार्गदर्शन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला. या अभियानाने महाविद्यालयात "जीवनदान देण्याचा संकल्प" अधिक दृढ केला आणि यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पानसरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गोपाळ चौधरी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...