नांदेड : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काही भागात जीवित हानी झाली आहे . या सर्व परिस्थितीची तातडीने पाहणी करून पंचनामे शासनाकडे सादर करावेत. नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे अशा सूचना खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना भ्रमणध्वनीवरून दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची माहिती खा. डॉ. अजित गोपछडे यांनी भ्रमणध्वनीवरून प्रशासनाकडून घेतली . शिवाय अनेक भागातील कार्यकर्ते आणि नागरिकांनीही त्यांना भ्रमणध्वनीवरून आपापल्या भागातील पूर परिस्थितीची माहिती दिली होती. कंधार तालुक्यात घराची भिंत कोसळून दांपत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समजल्यानंतर खा. डॉ. अजित गोपछडे यांनी या घटनेमुळे आपल्याला अतिव दुःख झाल्याचे सांगितले. या मयत दांपत्याच्या कुटुंबीयांना तातडीने अर्थसहाय्य करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
देगलूर , बिलोली, नायगाव, मुखेड, लोहा , कंधार, हदगाव, हिमायतनगर, माहूर , किनवट, भोकर, अर्धापूर, भोकरसह जिल्ह्यातील सर्वच भागात झालेल्या अतिवृष्टीचे तातडीने पचनामे करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे . शिवाय जनजीवन विस्कळीत झाले आहे . त्यामुळे त्या त्या भागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांशी त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आहे. आपण पालकमंत्र्यांशी संपर्क साधणार असून नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही खा. डॉ .अजित गोपछडे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा