०५ मार्च २०२६

सगरोळी व गंजगाव येथे मांजरा नदीपात्रात विना रॉयल्टी बेकायदेशीर रेती उत्खनन; कारवाईची मागणी



गौतम गावंडे | बिलोली

बिलोली तालुक्यातील सगरोळी व गंजगाव परिसरातील मांजरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर विना रॉयल्टी बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी बिलोली तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सगरोळी व गंजगाव परिसरातील मांजरा नदीपात्रातून काही व्यक्तींकडून पोकलेन व जेसीबीसारख्या अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेतीचे उत्खनन केले जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, हायवा व डंपरच्या माध्यमातून रेतीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असल्यामुळे शासनाला मोठा महसुली तोटा होत असून नदीपात्रातील नैसर्गिक समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या बेकायदेशीर उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणावरही गंभीर परिणाम होत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा होत असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होण्याचा धोका निर्माण होत असून भविष्यात शेती व पिण्याच्या पाण्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार तसेच रेती ठेकेदार यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने तात्काळ कारवाई करून बेकायदेशीर उत्खनन थांबवावे, उत्खननासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करावी, तसेच नदीपात्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देखरेख वाढवावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. तसेच रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून जीपीएस प्रणालीची पडताळणी करावी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर गौतम गावंडे, दयानंद भद्रे, शंकर पवारे, दिपक केसराळीकर व उत्तम घाटे  सिद्धार्थ कांबळे कुंडलवाडीकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...