२३ ऑगस्ट २०२५

एक हात मदतीचा’ : खुशी सेवाभावी संस्थेचा पूरग्रस्तांना दिलासा

 



देगलूर/प्रतिनिधी


       मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हसनाळ, भिंगोली, भेंडेगाव, रावणगाव, मारजवाडी,भासवाडी या गावांत पूरस्थिती निर्माण झाली. शेतमाल वाहून गेला, जनावरे दगावली, घरे उद्ध्वस्त झाली आणि शेकडो कुटुंबांवर संकट कोसळले.

       अशा कठीण प्रसंगी खुशी सेवाभावी संस्था तातडीने पुढे सरसावली. संस्थेच्या वतीने रावणगावसह परिसरातील पूरग्रस्तांना शेकडो अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष एकनाथ (बबलू) टेकाळे यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “गावातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे.”

      बबलू टेकाळे यांनी याआधीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना मदत, तसेच कोणत्याही धर्म-जातीचा भेद न करता समाजासाठी कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

        पूरग्रस्तांना दिलासा देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. संकटाच्या काळात मदतीचा एक हातही मोठा आधार ठरतो, हे त्यांच्या कार्यातून अधोरेखित झाले.

       या वेळी संपादक गजानन टेकाळे, पत्रकार शेख असलम, धनाजी देशमुख, बालाजी चंदावाड, शेखर कोठारे, अनिल कांबळे, गंगाधर उल्लेवार, दीपक पिंटू फुगारे, आदी उपस्थित होते.

१९ ऑगस्ट २०२५

प्रमोदजी देशमुख व.डॉ. गोपाळ चौधरी यांना बिलोली भूषण पुरस्कार

बिलोली तालुक्यातील मौजे सगरोळी येथील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल संपूर्ण देवगिरी प्रांतात प्रसिद्ध असलेल्या संस्कृती संवर्धन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रमोदजी देशमुख  आणि अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक तसेच पानसरे कनिष्ठ महाविद्यालयाचे  उपप्राचार्य प्रा.डॉ. गोपाळराव चौधरी यांना बिलोली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. 

प्रमोद देशमुख यांची विविध क्षेत्रात असलेले कार्य शैक्षणिक, सामाजिक व गोरगरिबांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनात  परिवर्तन घडवून त्यांना एका वेगळ्या वाटेवर आणून तसेच पाणी संवर्धन, वृक्षवल्ली विविध साहित्य संमेलने, शिबिरे, व्याख्याने अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान असलेले प्रमोद देशमुख यांना तसेच प्रा.डॉ. गोपाळ चौधरी यांनी बिलोली येथे कीर्तन महोत्सव, लावणी महोत्सव, एकांकिका महोत्सव, लोककला महोत्सव, साहित्य संमेलन ,कवी संमेलन , व्याख्यानमाला विविध शिबिरे यातून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करून समाजामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे मोलाचे कार्य केल्याबद्दल तसेच विविध क्षेत्रात सूत्रसंचालनाच्या माध्यमातून व्याख्यानाचे व भाषणाचे द्वारे सतत वावर असणारे तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य असणारे पानसरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मराठी विषयाचे उत्कृष्ट प्राध्यापक प्रा. डॉ. गोपाळ चौधरी यांना बिलोली नगरीचे भूमिपुत्र तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त महालेखा वित्त अधिकारी बी.पी. नरोड यांचे मार्गदर्शनाखाली गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळ बिलोलीच्या वतीने यापूर्वीच अनेक मान्यवरांना बिलोली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलाकार बिलोलीचे भूमिपुत्र दिलीप खंडेराय,डॉ भीमराव अंकुशकर, अश्विनी हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र बिलोलीकर अशा अनेक कला, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय इत्यादी क्षेत्रातील एकूण तेरा मान्यवरांना बिलोली भूषण पुरस्कार जाहीर झालेले आहेत. या पुरस्काराचे नियोजन व आयोजन काही दिवसात बिलोली येथे महाराष्ट्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते संपन्न होणार आहे.सदर आयोजन हे रवींद्र नगर येथील मूकबधिर विद्यालयाच्या मैदानावर संपन्न होणार आहे. असे गंगामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री बी.पी. नरोड यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसे पहिले तर श्री बी.पी. नरोड यांनी बिलोलीत टँकरद्वारे गरजवंतांपर्यंत पाणी वाटप तसेच विविध मोफत वैद्यकीय शिबीर रवींद्र नगर येथे नमस्ते बिलोली किचन सेंटर व उद्योग सेंटरचे उद्घाटन  झालेले आहे. ज्याद्वारे बिलोली तालुक्यातील बचत गटाच्या विविध महिलांसाठी व त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून सदर लघुउद्योग सुरू करण्यात आलेले आहेत. बिलोली भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तेरा मान्यवरांची तसेच शिक्षण महर्षी प्रमोदजी  देशमुख प्रा.डॉ.गोपाळ चौधरी, डॉ. रवींद्र बिलोलीकर, डॉ. भीमराव अंकुशकर ,दिलीप खंडेराय इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा व त्यांचे अभिनंदन आणि कौतुक सर्व क्षेत्रातून होत आहे.

जागतिक डास दिन " २० ऑगस्ट

 " 


 

माननीय संचालक, राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम,  आरोग्य सेवा, महासंचानालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व मा. डॉ.संदीप सांगळे साहेब, सह संचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जल जन्य रोग) पुणे-६ यांनी दि. १४ ऑगस्ट रोजी पत्र निर्गमित करून " जागतिक डास दिन "  दि.    २० ऑगस्ट रोजी साजरा करणे बाबत सूचित केले आहे.

माझे गुरुवर्य राज्य किटक शास्त्रज्ञ पुणे, मा. डॉ. महेंद्र जगताप सर, मा. डॉ. सोमाजी अनुसे सर यांच्या मार्गदर्शनानुसार " जागतिक डास दिन " बद्दल लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे.


 देशात किटकजन्य आजार (VBDs) ही सार्वजनिक आरोग्याची प्रमुख समस्या आहे. सर रोनाल्ड रॉस यांनी १८९७ मध्ये मादी अॅनोफिलीस डासांद्वारे मानवी हिवतापाचा प्रसार होतो असा शोध लावला होता. दरवर्षी, दिनांक २० ऑगस्ट रोजी सर रोनाल्ड रॉस यांच्या वाढदिवसानिमित्त "जागतिक डास दिन (WMD)" साजरा केला जातो. " जागतिक डास दिन (WMD)" साजरा करण्याचा मुख्य उद्देश डासांचे प्रसार रोखणे व नियंत्रण करणे हा आहे. किटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी विविध स्तरांवर समाजातील विविध घटकातील लोकांचा सहभाग वाढविणे तसेच डास नियंत्रणाकरीता एकात्मिक किटकशास्त्रीय उपाययोजना राबविणे असा आहे.

या वर्षी " जागतिक डास दिनाची (WMD) " मुख्य संकल्पना " हिवताप विरुद्धच्या लढाईला जगासाठी अधिक अतिगतीमान करूयात " ("Accelerating the Fight Against Malaria for a More Equitable World"), जे की हिवताप निर्मूलनाकरीता प्रभावी व तात्काळ उपाययोजना अंमलबजावणीच्या प्रयत्नावर भर देते. विशेषतः सर्वांत दुर्गम आणि अतिदुर्गम लोकसंख्येसाठी किटकजन्य आजारांचा प्रतिबंध, निदान आणि उपचार सेवा पोहोचविणे, सुनिश्चित करणे हे आहे.

 NCVBDC अंतर्गत हिवताप आणि इतर किटकजन्य आजार प्रतिबंध, नियंत्रण आणि निर्मूलनासाठी एकात्मिक किटक व्यवस्थापनेतंर्गत कीटकशास्त्रीय सर्वेक्षण आणि किटक नियंत्रणाचे महत्त्व है महत्वपूर्ण धोरणांपैकी एक आहे. याकरीता आपण सर्वांनी जाणीवपूर्वक आणि वचनबद्धतेने "जागतिक डास दिन (WMD)" साजरा करू या.

हिवताप प्रतिबंध, लवकर निदान आणि वेळेत व संपुर्ण उपचार यावरील प्रमुख संदेशांना प्रोत्साहन देण्यासाठी संदेश प्रसारित करताना डेंग्यू आणि चिकनगुनियासह सर्व किटकजन्य आजारांचा संदेश प्रसारणामध्ये समावेश सुनिश्चित करावा.

प्रभावी प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना राबविण्यासाठी आंतर विभागीय समन्वय खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये विविध विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. एकात्मिक किटकशास्त्रीय सर्वेक्षण आणि अधिक काळ टिकणारे नियंत्रण उपाययोजना राबविण्याकरीता ग्रामीण विकास, शहरी स्थानिक संस्था, शिक्षण, आदिवासी यासारख्या विभागांसह समन्वय व सहभाग प्राप्त करून घेऊन या साथरोगांचा प्रतिबंध करावा, जनतेच्या सहभागाने पर्यावरण पुरक एकात्मिक किटकशास्त्रीय सर्वेक्षणाव्दारे डासोत्पती स्थाने नष्ट करणे, साठलेल्या व साठवलेल्या स्वच्छ पाण्याचे साठे रिकामे करणे, झाकून ठेवणे तसेच वाहते करणे, कोरडा दिवस पाळणे, जीवशास्त्रीय उपाययोजना (गप्पी मासे सोडणे) करावेत.

राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्वरीत निदानाद्वारे रुग्ण शोध घेऊन तात्काळ व समुळ उपचार करावेत. मा. संचालक, NCVBDC, आरोग्य सेवा महासंचालनालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्राव्दारे उपरोक्त उल्लेख केलेल्या बाबीचा समावेश करुन दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी "जागतिक डास दिन (WMD)" साजरा करून सन २०३० पर्यंत हिवताप निर्मूलनाच्या राष्ट्रीय ध्येया साठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा निश्चित करूयात. या मोहिमेत कोणीही मागे राहणार नाही याची खात्री व प्रयत्न करुन, हिवतापमुक्त आणि निरोगी भारताचे स्वप्न साकार करु.

राष्ट्रीय किटक जन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची लातूर विभागात प्रभावी अंमलजावणी मा. डॉ. अर्चना भोसले - किर्दक मॅडम, उप संचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ, मा. डॉ. हणमंत वडगावे साहेब, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) लातूर, नांदेड जिल्ह्यात मा.डॉ. संगीता देशमुख मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, मा. डॉ. संजय पेरके सर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ. अमृत चव्हाण सर जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड, मा. डॉ. प्रताप चव्हाण सर वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर, सर्व वैद्यकीय अधिक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे.


जागतिक डास 🦟 दिन : संक्षिप्त टिपण...

---------------------

 आज २० ऑगस्ट " जागतिक डास दिन"  याच दिवशी २० ऑगस्ट  १८९७ रोजी डॉ रोनाल्ड रॉस यांनी कलकत्ता येथे हिवतापाचे जंतू हे डासांच्या पोटात आढळून आल्याचा शोध लावला व हा शोध आपल्याच देशात लावल्याने या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे हा दिवस जागतिक मच्छर (डास) दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.

जगामध्ये डासांच्या जवळ जवळ ३५०० प्रजाती आहेत या प्रजाती साधारणत:  अनोफेलीस, क्युलेक्स , एडीस व मंसोनिया चार जमातींमध्ये विभागलेले आहेत. या चार जमाती वेवेगळ्या आजारांचा प्रसार करतात. अनाफेलिस डासापासून हिवतापाचा प्रसार होतो, कुलेक्स डासा पासून हत्तीरोग व जपानी मेंदुज्वर या आजाराचा प्रसार होतो तर एडीस डासापासून झिका, डेंग्यू चिकन गूनिया या आजारांचा प्रसार होतो तर मंसोनिया डासापासून हत्तीरोग होत असतो. हे विविध आजार पसरविणारे डास व आजार यांची वैशिष्टे खालील प्रमाणे


-: हिवतापाचे प्रसार करणारे डास:-

हिवताप हा एक थंडी वाजून येणारा ताप असून या आजाराचे सर्वाधिक प्रमाण हे आफ्रिकेमध्ये व त्यानंतर आशिया खंडामध्ये दिसून येते या आजाराचा प्रसार करणाऱ्या डासाचे नाव आहे अनाफेलिस. महाराष्ट्रामध्ये ॲनाफिलीस या डासाच्या तीन प्रजाती पासून हिवताप होत असतो त्या आहेत अनोफेलिस क्युलिसीफिसेस, अनोफेलिस स्टिफेंसी, अनोफेलिस फ्लुवातलीस  या डासांच्या जीवनशैलीचा जर विचार केला तर हा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालत असतो. या डासाच्या अळीचे वैशिष्ट्य म्हणजे ती पाण्याच्या पृष्ठभागावर समांतर तरंगत असते. या डासाच्या पंखावर पांढरे ठिपके असतात व हा डास भिंतीशी 45 अंशाचा कोन करून बसतो. हे डास रात्री अथवा पहाटे चावत असतात शक्यतो गाढ झोपे मध्ये असतानाच हे डास लोकांना चावत असतात एकदा चावल्यानंतर हा डास तीन दिवस पूर्णपणे भिंतींवर विश्रांती घेत असतो त्यामुळे या  डासाच्या प्रतिबंधासाठी आपण घरोघरी नियमित फवारणी केली जाते किंवा कीटकनाशक भारीत मच्छरदानीचा वापर केला जातो.


-: डेंगी, चिकनगुनिया व झिका आजार :-


 हा आजार हा एडीस डासाच्या प्रजाती पासून होतो. महाराष्ट्रामध्ये या प्रजातीच्या तीन प्रजाती य आजारांचा प्रसार  करतात. एडीस इजीप्ताय, एडीस अल्बोपिक्टस व एडीस विटाटस यांचे मार्फतच या आजारांचा प्रसार होत असतो या डासांची वैशिष्ट्य म्हणजे यांच्या अंगावर आणि पायावर पांढरे पट्टे दिसून येतात तसेच रंगाने काळपट असतात. हे डास दिवसा चावतात व वारंवार चावतात. त्यामुळे घरातील सर्व लोक बाधित करण्याची शक्यता असते. हे डास  विश्रांतीसाठी लोबकळणारे वस्तू, पडदे, वायर या वरती तसेच अंधाऱ्या व थंड जागी विश्रांती घेत असतात. त्यामुळे या आजारांमध्ये प्रामुख्याने हे डास मारण्यासाठी धूर फवारणी केली जाते या डासाची आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा डास साचलेल्या व साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतो.  हा डास फुटकी टायर्स डबे बाटल्या इत्यादी घराच्या आजूबाजूला जे निरुपयोगी साहित्य असते त्यामध्ये पावसाचे पाणी साचून तयार झालेल्या ठिकाणी अंडी घालत असतो. घरामधील फुलदाण्या, फ्रिज, कुलर यामध्ये त्याचे प्रजनन होत असते.  त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व पाणीसाठी झाकून ठेवणे व निरुपयोगी साहित्याची विल्हेवाट लावणे.

. -: हत्तीरोग :-

 हत्तीरोग हा विकसनशील देशांना अत्यंत भेडसावणारा असा हा आजार आहे. खरतर या आजाराची गणना ही NTD ( Neglected Tropical Disease) मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. खऱ्या अर्थाने हा दुर्लक्षित परंतु सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. या आजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पायाला येणारी सूज ही एकदा सुरु झाली थोड्याफार पद्धतीने नियंत्रित करता येते. परंतु एकदा हा आजार झाला तर तो मात्र शेवटपर्यंत बरा होत नाही. ते व्यंग घेऊन त्या व्यक्तीला जन्मभर रहावे लागते. हत्ती रोगाचा प्रसार हा कूलेक्स डासांच्या प्रजाती पासून होतो.  हत्तीरोग हा कूलेक्स क्विंकीफिसीयाटुस या प्रजातीपासून होतो. या डासांचे प्रजनन हे घाणेरड्या तसेच प्रदूषित पाण्यामध्ये होत असते. गटारी, नाले, सेप्टिक टॅंक मध्ये अंडी घालत असतो. या आजारात गटारी वाहती करणे सेप्टिक टॅंक ला जाळ्या बसवणे, वेंट पाईपला जाळी बसवणे इत्यादी उपाय योजना केल्या जातात. या डासाची चावण्याची सवय ही संध्याकाळच्या वेळेला तिन्हीसांजेच्या वेळेला असते 

-: जपानी मेंदुज्वर :-

 हा आजार कूलेक्स विष्णूई या प्रजातीच्या डासांपासून होत असतो. हा डास प्रमुख्याने जिथे भात शेती किंवा पान वनस्पती आहेत अशा ठिकाणी प्रजनन करतो या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाला या आजाराची लागण ही अपघाताने होते  परंतु या आजाराची तीव्रता लहान मुलांच्या मध्ये जास्त आहे.  हे डास विश्रांतीसाठी घराच्या बाहेरच्या बाजूला झाडाझुडपा मध्ये विश्रांती घेतात त्यामुळे या आजारांमध्ये आपण घरा मध्ये तसेच घराबाहेर धूर फवारणी करत असतो.


- - आजारामुळे होणारे दुष्परिणाम

यामुळे बाधित लोकांची तसेच त्यामधील मृत्यूंची संख्या वाढते. औषधावरील खर्च वाढतो, मनुष्यबळाचा नाश होतो,

 देशाचे आर्थिक नुकसान होते,डासांच्या नायनाटासाठी किमती कीटकनाशकांचा वापर केला जातो याचा दुष्परिणाम मनुष्य तसेच इतर उपयोगी कीटकांवर होतो.


- - या डासांची वाढ रोखणेसाठी खालील सोप्या उपाययोजना कराव्यात

या डासांना प्रतिबंध करण्यापूर्वी डासांचे जीवन चक्र समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक डास हा दर तीन दिवसांनी 150-200 अंडी घालत असतो. या अंड्यातून एक ते दोन दिवसात अळी तयार होते. या अळीच्या चार अवस्था झाल्यानंतर त्याचा कोष तयार होतो व या कोषातून संपूर्ण डास साधारणतः 8-12 दिवसांमध्ये तयार होत असतो.  अंडी अळी कोष यांची वाढ ही पाण्यात होत असते. त्यामुळे ही वाढ पाण्यातच रोखणे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण एकदा प्रौढ डास तयार झाल्यानंतर त्याला पकडणे किंवा त्याला मारणेसाठी खूप किमती कीटक नाशके वापरावी लागतात. त्यात ती दिलेल्या मात्रेत डासापर्यंत जाणे महत्त्वाचे आहे तसे झाले नाही तर डासामध्ये प्रतिरोध निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्यातील अळीला मारणे केंव्हाही सोपे.  हे कमी खर्चिक आहे. त्यामुळे खालील सोप्या उपाय योजना अमलात आणल्यास निश्चितच या आजारांना प्रतिबंध करता येईल.

1.घरातील गावातील सर्व पाणी साठे वाजाते करावेत.

2.साठवलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत.

3.जे सिमेंटचे कंटेनर रिकामे करता येत नाहीत अशामध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस याअळीनाशकांचा वापर करावा.

4.गावांमध्ये कोरडा दिवस पाळण्यात यावा.

5.वेंट पाइपला जाळ्या बसवावेत.

6.गावातील निरुपद्रवी निरुपयोगी असणाऱ्या टायरचे एकत्रित संकलन करून त्याचा नायनाट केलेस 25 टक्के रुग्ण संख्येत घट होऊ शकते.

7.गटारी वाहती करावीत.

8.घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.

9.रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा .

10.दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये राहावे.

11.संध्याकाळी घरामध्ये धूर करावा

 -: जनतेसाठी आवाहन :-

ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे. कोणताही ताप अंगावर काढू नये.  या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. 

घराच्या आजू बाजूला पाणी साठून देऊ नका. 

कोणत्याही परिस्थीतीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण करू नका...

 - लेख, लेखक - 

- - सत्यजीत टिप्रेसवार,

- आरोग्य निरीक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर जि. नांदेड.

- ९४२३०३०९९६. satyajit996@gmail.com

 *******

१६ ऑगस्ट २०२५

संत तुकडोजी महाराज त्यांचा बिलोलीतील मुक्काम प्रेरणादायी-एडवोकेट गोपाळराव बिलोलीकर

 



संत तुकडोजी महाराज यांचा बिलोलीतील मुक्काम प्रेरणादायी असाच होता. अशी आठवण विधीज्ञ गोपाळराव बिलोलीकर यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य  दिनाचें औचित्य साधून हुतात्मा स्मारक येथे आयोजित "संवाद ज्येष्ठांसोबत...!" घेण्यात आला. ज्येष्ठांच्या आठवणी यावेळी प्रसारित करण्यात आल्या. ज्येष्ठांच्या आठवणी लिपीबद्ध करण्याचें यावेळी ठरले. आठवणी सांगताना एडवोकेट गोपाळराव बिलोलीकर पुढे म्हणाले  की,  पोलीस ॲक्शनचा काळ मला चांगला आठवतो. उर्दू शाळेवर हिंदुस्तानचा ध्वज फडकवण्यासाठी झालेला आक्रमकपणा त्यावेळी मी व माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांनी अनुभवला होता.


 संत तुकडोजी महाराज यांच्या विषयी सांगताना ते पुढे असेही म्हणाले की, त्यांचा सहवास अत्यंत प्रेरणादायी असा होता. उंच धिपाड असे शरीर. महाळप्पा पटणे यांच्या घरापाठी मागील मैदानात संत तुकडोजी महाराज यांचे शिष्य *काठी कला* शिकवत असत. संत तुकडोजी महाराज यांचा सहवास स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांना तर लाभलाच, त्याचबरोबर मला आणि एडवोकेट चंद्रकांतराव बिलोलीकर यांनाही लाभला. त्यांच्या सहवासात आलेला अनुभव हा अत्यंत महत्त्वपूर्ण असाच होता. ते पुढे असेही म्हणाले की, संत तुकडोजी महाराज यांच्या शिष्याने शिकवलेली लाठी कला अनेकांना नंतर खूप उपयोगी ठरली. त्याचबरोबर यातील ज्यांनी कला शिकले त्यांनी पुढच्या पिढीला शिकवण्याचा प्रयत्न केलेला होता.. यावेळी एडवोकेट, पवार, बी पी नरोड यांनी अशा आठवणी लिपीबद्ध होण्याची गरज प्रगट केली.

जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचे तातडीने पंचनामे करा : खा. डॉ. अजित गोपछडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी साधला भ्रमणध्वनीवरून संपर्क

 

 

नांदेड :  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काही भागात जीवित हानी झाली आहे . या सर्व परिस्थितीची तातडीने पाहणी करून पंचनामे  शासनाकडे सादर करावेत. नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे अशा सूचना खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना भ्रमणध्वनीवरून दिले आहेत. 

नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची माहिती खा. डॉ. अजित गोपछडे यांनी भ्रमणध्वनीवरून प्रशासनाकडून घेतली . शिवाय अनेक भागातील कार्यकर्ते आणि नागरिकांनीही त्यांना भ्रमणध्वनीवरून आपापल्या भागातील पूर परिस्थितीची माहिती दिली होती.  कंधार तालुक्यात घराची भिंत कोसळून दांपत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समजल्यानंतर खा. डॉ. अजित गोपछडे यांनी या घटनेमुळे आपल्याला अतिव दुःख झाल्याचे सांगितले. या मयत दांपत्याच्या कुटुंबीयांना तातडीने अर्थसहाय्य करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

 देगलूर , बिलोली,  नायगाव,  मुखेड,  लोहा , कंधार,  हदगाव,  हिमायतनगर, माहूर , किनवट,  भोकर,  अर्धापूर, भोकरसह जिल्ह्यातील सर्वच भागात झालेल्या अतिवृष्टीचे तातडीने पचनामे  करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे . शिवाय जनजीवन विस्कळीत झाले आहे . त्यामुळे त्या त्या भागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांशी त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आहे. आपण पालकमंत्र्यांशी संपर्क साधणार असून नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आणि ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही खा. डॉ .अजित गोपछडे यांनी सांगितले.

१३ ऑगस्ट २०२५

अवयवदान जीवन देणारा संकल्प - प्रा. डॉ. गोविंद चौधरी

 अंगदान – जीवनदानाचा संकल्प : पानसरे महाविद्यालयात प्रेरणादायी उपक्रम





अर्जापूर, ता. बिलोली –

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या "अंगदान जीवन संजीवनी अभियान" या जनजागृती उपक्रमांतर्गत दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे एक प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यभर चालणाऱ्या या अभियानाचा उद्देश समाजात अवयव दानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.


या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय, बिलोली येथील औषध निर्माण अधिकारी एकलारे,  समुपदेशक दिनेश तळणे व सुंदर चव्हाण यांनी महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना अंगदानाचे सामाजिक, वैद्यकीय व नैतिक महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “एक व्यक्तीचा अवयव दानाचा संकल्प आठ जणांना नवजीवन देऊ शकतो. मृत्यूनंतरही आपले अस्तित्व इतरांच्या श्वासात, हृदयाच्या ठोक्यात जिवंत राहू शकते, यापेक्षा मोठा परोपकार नाही.” त्यांनी विद्यार्थ्यांना ‘नोटो’ (राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था) अंतर्गत नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आणि अंगदानातील वैधानिक बाबींचा ऊहापोह केला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गोविंद चौधरी होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. चौधरी म्हणाले, “अवयवदान ही केवळ एक कृती नाही, तर ठी जीवनाला नवसंजीवनी देणारी देणगी आहे. देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर अवयवदानाची टक्केवारी अद्याप अपुरी आहे. आपण सर्वांनी पुढाकार घेऊन हा संकल्प व्यापक करायला हवा. आपल्या एका निर्णयाने अनेक घरांमध्ये आनंदाचे दिवे पुन्हा पेटू शकतात.” त्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित प्राध्यापकांना अंगदानासाठी खुले आवाहन करत ‘नोटो’ अंतर्गत त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन केले.


याप्रसंगी हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. देविदास जाधव यांनीही अंगदानाचा संदेश अंतःकरणात रुजवून तो कृतीत उतरविण्याचा निर्धार करणे गरजेचे असे मत व्यक्त केले.  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, प्राध्यापकांचे प्रोत्साहन आणि आरोग्य विभागाचे मार्गदर्शन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला. या अभियानाने महाविद्यालयात "जीवनदान देण्याचा संकल्प" अधिक दृढ केला आणि यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पानसरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गोपाळ चौधरी यांनी केले.

०६ ऑगस्ट २०२५

कुंडलवाडीत आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा

 

.


महायुतीचे लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील के.रामलू मंगळ कार्यलयात दि.8 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी ठिक दुपारी 1=00 वाजता मा.नगराध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार आणि महायुतीचा मित्र परिवारातर्फे अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे.शहरातील पत्रकारांचा सन्मान सत्कार करण्यात येणार आहे.आणि दिव्यांग व्यक्तीस साहित्य वाटप व वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

तरी शहर परिसरातील नागरीक,

महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्यासंख्येत कार्यक्रमास उपस्थित राहावे.असे विनंती.भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष हणमंलू ईरलावार,शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष लक्ष्मण गंगोणे,राष्ट्रवादी अजित पवार गट शहराध्यक्ष गंगाधर मरकंटे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

०४ ऑगस्ट २०२५

" जागतिक स्तनपान सप्ताह " ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

 



भोकर :- दरवर्षी " जागतिक स्तनपान सप्ताह " दि. 1 ते 6 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी  नांदेड मा. राहुल कर्डीले सर, मा. मेघना कावली मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड,मा. डॉ संजय पेरके सर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ. संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, मा. डॉ. राजाभाऊ बुट्टे सर निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड, नोडल अधिकारी मा. डॉ. हनुमंत पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार व मा. डॉ. प्रताप चव्हाण सर वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या नियोजनानुसार " जागतिक स्तनपान सप्ताह " साजरा करण्यात आला.

आई आणि बालकाच्या आरोग्यासाठी स्तनपानाचे महत्व अधोरेखित करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. 

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनिसेफ (UNICEF) यांनी शिफारस केल्यानुसार, जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे आणि पहिले सहा महिने केवळ स्तनपान करणे बालकाच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर, दोन वर्षांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ पूरक आहारासोबत स्तनपान सुरू ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

स्तनपानाचे फायदे केवळ बालकापुरते मर्यादित नाहीत, तर ते मातेसाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत. स्तनपानामुळे मातेमध्ये प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव कमी होतो, गर्भाशयाला मूळ स्थितीत येण्यास मदत होते आणि काही विशिष्ट कर्करोगाचा धोका कमी होतो. बालकांसाठी, स्तनपान हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते, संसर्गापासून संरक्षण देते, कुपोषण आणि अतिसाराचा धोका कमी करते.

" जागतिक स्तनपान सप्ताह " बाबत मा. डॉ. सविता कांबळे मॅडम स्त्री रोग तज्ञ यांनी स्तनदा मातांना स्तनपान ची योग्य पद्धत व स्तनपानचे महत्व सांगून तसेच गरोदर मातांना योग्य आहारा बद्दल उपस्थित मातांना विस्तृत माहिती दिली. यावेळी श्रीमती राजश्री ब्राम्हणे इन्चार्ज सिस्टर, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, आरोग्य सेविका श्रीमती सरस्वती दिवटे, मुक्ता गुट्टे, संगीता पंदीलवाड,आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, योगेश पवार, स्तनदा माता व गरोदर माता उपस्थित होत्या.

०३ ऑगस्ट २०२५

दौलापूर येथे महसूल सप्ताह निमित्त वृक्षारोपण

 


महाराष्ट्र शासन महसूल सप्ताह दिन एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट त्या अनुषंगाने बिलोली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे मॅडम व तसेच तहसीलदार गजानन शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी मौजे दौलापूर कोटग्याळ शिव रस्त्यावर कुंडलवाडी  मंडळ अधिकारी  ज्योती जिगळे मॅडम तसेच ग्राम महसूल अधिकारी बी जे कांबळे व ग्राम महसूल अधिकारी पवन ठकरोड उपसरपंच प्रतिनिधी नामदेव पाटील संचालक गणपतराव पाटील व महसूल सेवक संजय गंडरोड कृष्णा तुंगेनवार प्रमुख उपस्थिती मध्ये वृक्षारोपण करण्यात आले या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक माधवराव पाटील विठ्ठलराव पाटील पत्रकार प्रल्हाद पाटील माजी उपसरपंच युसुफ शेख रोजगार सेवक गंगाधर डोंगरे आनंदराव पाटील साहेबराव पाटील  समदानी शेख आसिफ शेख आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...