चिलगव्हाण (ता.महागाव, जि.यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी आपली पत्नी व चार मुलांसह दत्तपुर (वर्धा )येथील कुष्ठधामात आत्महत्या केली. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या नोंद झालेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते या घटनेला गुरुवारी १९ मार्च रोजी ३४ वर्षे पूर्ण होत आहेत. साहेबराव करपे यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहून नायगाव तालुक्यातील शेतकरी एक दिवशी अन्नत्याग आंदोलन तहसील कार्यालय समोर करणार आहेत अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी दिली.
अन्नत्याग आंदोलनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत, खरीप हंगाम २०१९-२० चा पीक विमा १०० टक्के लागू करावा, सरसकट संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांना शासनाकडून जी मदत दिली जाते ती शेतकऱ्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात जमा करण्यात यावी, यावर्षीच्या (२०२०-२१) रब्बी हंगामात हरभरा गहू पिकांचे नुकसान झाले त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
अन्नत्याग आंदोलन सकाळी ११ ते ०४ या वेळेत होणार आहे या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा व ज्या शेतकऱ्यांना या आंदोलनात उपस्थित राहणे शक्य होणार नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून ११ ते ०४ या वेळेत अन्नाचा कण न घेता अन्नत्याग आंदोलनात सहभाग नोंदवावा असे आव्हान पांडुरंग शिंदे यांनी केले आहे.
नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून फसवण्यात आलेले आहे, शेतकऱ्यावर जो अन्याय झालाय त्याला वाचा फोडण्यासाठी हे प्राथमिक स्वरूपाचे आंदोलन आहे या पुढील दिशा सर्व शेतकऱ्यांची उपस्थिती ठरवण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा