भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेची रक्कम तत्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करा-संविधान दुगाने
जिल्हाधिकारी व समाजकल्याण आयुक्ताला इंडियन पँथर सेनेचे ऑनलाइन निवेदन सादर
मुखेड प्रतिनिधी/भारत सोनकांबळे
शैक्षणिक वर्ष २०१९-२० हे संपत आले तरी अद्यापही नांदेड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेपासून शिष्यवृत्ती व समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत.या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन इंडियन पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संविधान दुगाने यांनी नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि समाज कल्याण उप आयुक्तांना लॉकडाऊनमुळे ऑनलाइन मेलद्वारे निवेदन सादर करून येत्या आठवडाभरात शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे देशावरील वाढत्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ग्रामीण भागातील शिक्षणानिमित्त शहरी भागात राहायला आलेल्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.बरेच पात्र विद्यार्थी हे शेतकरी,मजुरदार व गरीब कुटुंबातील आहेत.त्यांची आर्थिक परिस्थिती लॉकडाऊनमुळे अत्यंत हालाकीची झाल्यामुळे त्यांच्यावर व परिणामी कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्यातच भारत सरकार शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष संपत आले,असतांनाही अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात १४ एप्रिल पूर्वी मिळणे अपेक्षित होते. पण लॉकडाऊन चा फायदा घेत शिष्यवृत्ती विभाग मात्र झोपा काढत आहे.
तसेच नांदेड समाज कल्याण विभागांतर्गत देण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम सुद्धा एप्रिल महिना संपला तरी अनेक विद्यार्थी पहिल्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत.
आतातरी शिष्यवृत्ती व समाज कल्याण विभागाला जाग येते का आणि येत्या आठवडाभरात विद्यार्थ्यांच्या खात्यात भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम अदा करून या लॉकडाऊन च्या आणीबाणीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना हातभार लावेल का?हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा