शिराढोण- (शुभम डांगे)
हळद या पिकाची लागवड करत असताना शेतकऱ्यांनी दहासुत्रीचा अवलंब करावा, आज हळदीला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. हळदीपासून सौंदर्य प्रसाधनाच्या साहित्याबरोबर सर्व प्रकारच्या कर्करोगाचे निदान करण्याचे घटक हळदीपासून मिळत असल्याने येणाऱ्या काळात हळद उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. पण शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यानंतर विक्रमी हळदीचे उत्पादन मिळू शकते असे मत कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. देवीकांत देशमुख यांनी हळद लागवड मार्गदर्शन मेळाव्यात शेतकऱ्यांना केले.
कंधार तालुक्यातील शिराढोण येथे उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवाडा 2019 जनजागृती अभियानाअंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन जिल्हा कृषी अधीक्षक रवीकांत चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती माधवराव पांडागळे, तंटामुक्त अध्यक्ष गणपतराव देवणे, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. देवीकांत देशमुख, कंधार तालुका कृषी अधिकारी आर.एम. देशमुख, मंडळ कृषी अधिकारी अंबुलगेकर, कृषी सहाय्यक भुषण पेठकर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजयकुमार गुडले, विनोद पुलकुंडवार व यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. देशमुख यांनी हळद लागवड व्यवस्थापन व किड व्यवस्थापन या संदर्भात शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी हळद लागवड करत असताना पाणी निचरा होईल अशा जमिनीचा वापर करावा, चुनखडी जमिनीचा वापर करू नये, हळदीवर येणाऱ्या कंदकुज आणि करपा या रोगाबाबत जागृत राहून वेळीच शेतकऱ्यांनी याचे व्यवस्थापन करावे, याचबरोबर दहा सुत्रे मार्गाचा अवलंब करून हळदीची लागवड करावी अशी सविस्तर माहिती एक दिवसीय मेळाव्यात डॉ. देशमुख यांनी दिली.
तालुका कृषी अधिकारी देशमुख यांनी खरीप हंगामातील पेरणीसंदर्भात व सोयाबीन पिकाच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली, यात बिज प्रक्रिया कशी करावे याचे प्रात्यक्षीकही शेतकऱ्यांना यावेळी करून दाखविले. कापसावर येणाऱ्या बोंडअळीचे व्यवस्थापन कसे करण्यात यावे याचे मार्गदर्शन यावेळी शेतकऱ्यांना करण्यात आले. सेंद्रीय खताचा वापर आणि बियाणांची निवड ही कृषी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या किंवा मान्यता प्राप्त खतबियाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा त्यांनी यावेळी केली. शिराढोण परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्याचे सुत्रसंचलन मन्मथ शेषेराव पांडागळे यांनी केले तर मेळावा यशस्वीतेसाठी भगवान देवणे, संभाजी वाघमारे, संगमेश्वर बाचे यांनी परिश्रम घेतले.
Dahasutri kasi padhat aahe?
उत्तर द्याहटवा