चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची विश्व परिवारची मागणी
देगलूर-
महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत संपूर्ण महाराष्ट्रभर 8 कोटी वृक्ष लागवड करण्याच्या अभियानाला सुरूवात केली खरी पण प्रत्यक्षात सामाजिक वनीकरण विभागाद्वारे ग्राम पंचायतीना पुरवलेल्या रोपट्यांचे पुढे काय होतंय, ती खरेच लावली जात आहेत का नाही हे पाहण्याची काहीच यंत्रणा नसल्यामुळे या प्रत्यक्ष जमिनीवर मात्र या चांगल्या अभियानाचा बोजवारा उडतो आहे. देगलूर तालुक्यात प्रत्येक ग्राम पंचायतीला साधारणतः 2 ते 3 हजार रोपे देण्यात आली खरी पण काही ग्राम पंचायतीनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटून टाकले अन् लहान मुलांकडून ती रोपे इकडेतिकडे फेकली गेली. अनेक गावात तर ग्राम पंचायतीच्या आजूबाजूला रोपांचे ढीग पडून असल्याचे आढळून आले.
सामाजिक कार्यकर्ते व विश्व परिवारचे कैलास येसगे कावळगावकर व सुभाष कदम यांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संघटनेतील अनेक तरूणांच्या माध्यमातून माहिती घेतली असता जवळपास देगलूर तालुक्यातील अनेक गावात शासकीय वृक्ष लागवडीचा बोजवारा उडाल्याची माहिती पुढे आली. म्हणून विश्व परिवार संघटनेने पुढाकार घेऊन देगलूर येथील मा. तहसीलदार अरविंद बोळंगे व गटशिक्षण अधिकारी मेतेवाड यांच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री, मा. वनमंत्री व मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून या अभियानात कामचूकार करणाऱ्या दोषी अधिकारी व पदाधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पर्यावरण संतुलन बिघडत असल्या कारणाने अनेक सामाजिक संघटना व व्यक्ती स्वयंस्फुर्तीने हजारो रूपये खर्च करून वृक्षारोपन करतायत व ती झाडे जगवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत. अन् शासनाचे करोडो रूपये मात्र शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाया जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा धमकीवजा इशारा कैलास येसगे कावळगावकर यांनी दिला.
याप्रसंगी अरूण पाटील रामपूरकर, सुभाष कदम, नगरसेवक निसार देशमुख, संजय पाटील चिटमोगरेकर, शेख अस्लम, जावेद अहमद, गजानन पाटील, गोपाळ सुरावार, दत्तात्र्य गिरी व अंकूश गोविंदवार यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा