सगरोळीचे भूमिपुत्र तथा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक मधु गिरगावकर यांना भाजपातर्फे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी रविवार (ता.११) रोजी सगरोळी (ता.बिलोली) येथे पहिली बैठक घेऊन जनतेशी संवाद साधला.
देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीकरिता राखीव मतदार संघ आहे. सध्या शिवसेनेचे सुभाष साबणे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर असल्याने, या मतदारसंघातील राजकीय वातावरण तापत असून, बैठका, चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी उभे राहण्याकरिता चाचपणी सुरु केल्याचे दिसत आहे. ह्या मतदारसंघातून भाजपतर्फे सगरोळीचे भूमिपुत्र मधु गिरगावर हे इच्छुक असून यासाठी सगरोळी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रयत क्रांती संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी, आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडे दहा ते बारा जागा मागितल्या असून नांदेड जिल्ह्यातील नायगाव व देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा समावेश असल्याचे सांगितले. मधु गिरगावकर हे प्रामाणिक व उच्च विद्याविभूषित व्यक्ती असल्याने त्यांना निवडणुकीकरिता संधी मिळावी यासाठी आमची संघटना तथा सदाभाऊ खोत आग्रही असल्याचे सांगितले. यासाठी या मतदार संघातील लोकभावना समजून घ्यावी याकरिता सगरोळी येथून बैठकांना सुरुवात केली असून भाजपचे जिल्हापातळीवरील जेष्ठ कार्यकर्ते तथा मतदार संघातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मतदारांनी समर्थन दिल्यास मधु गिरगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेना व भाजपची युती न झाल्यास भाजपतर्फे मधु गिरगावकर यांनाच उमेदवारी मिळावी असा आग्रह असेल किंवा हा मतदार संघ मित्रपक्षासाठी सोडवून युतीतर्फे गिरगावकर यांना उमेदवारी देण्यात येईल असाही आमच्या संघटनेचा प्रयत्न राहील असे पांडुरंग शिंदे म्हणाले.
अभियंता या पदावर कार्यरत असतांना गिरगावकर यांनी अनेक गावे दत्तक घेऊन विविध योजना राबविल्या. त्यांना सामाजिक कार्याचा भरपूर अनुभव असून मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासोबत त्यांनी कृषी विकासाबाबत इस्राईल व इतर अनेक देशांना भेटी देऊन तेथील विकासाचे मॉडेलचे अवलोकन केले असल्याने, त्यांच्या पाठीशी चांगला अनुभव असल्याचे अनिल तोष्णीवाल यांनी सांगितले. खंडेराव देशमुख, भाजपचे तालुका उपाध्यक्ष मारुती राहिरे, माजी जिल्हापरिषद सदस्य चंद्रकांत देवारे, नागनाथ पाटील माचनुरकर, साहेबराव अंजनीकर आदींनी आपल्या भाषणातून गिरगावकर यांना पाठींबा दर्शविला. यावेळी सुनील देशमुख, व्यंकट सिद्नोड, मारुती सिद्नोड, व्यंकट भरदे, मारुती कुरुद्गे, पत्रकार राजू पाटील शिंपाळकर, प्रकाश फुगारे यांच्यासह सगरोळी परिसरातील जवळपास दीडशे ते दोनशे नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा