मुख्यमंत्र्यांकडे स्वच्छतादूत राजेश्वर कांबळे यांची मागणी
प्रतिनिधी, कंधार
मानार (मन्याड) नदीत बुडणाऱ्या दोन मुलांचे जीव वाचविणाऱ्या कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या १४ वर्षीय बालकास ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’ देऊन यथोचित गौरव करण्यात यावा अशी मागणी स्वच्छतादूत तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश्वर कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे कंधार तहसिलदारा मार्फत केली आहे.
कंधार येथील मनोविकास शाळेतील इयत्ता १० वी वर्गात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ओम विजय मठपती (१६), आदित्य कोंडीबा दुंडे (१६) व गजानन विश्वनाथ श्रीमंगले (१६) हे तिघे मित्र शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मौजे घोडज येथील ऋषी महाराज मंदिरच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनापूर्वी ते आंघोळ करण्यासाठी मंदिराच्या जवळ असलेल्या मन्याड नदीवरील धोबीघाटावर गेले होते. परंतु तिघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने तिघेही पाण्यात बुडू लागले. याच दरम्यान मौजे घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (१४) दर्शनासाठी आला होता. बुडणाऱ्या मुलांचा आवाज त्याच्या कानावर पडला असता क्षणाचाही विलंब न करता त्याने आवाजाच्या दिशेने नदीकडे धाव घेतली. यानंतर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता बुडणाऱ्या मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. आदित्य कोंडीबा दुंडे व गजानन विश्वनाथ श्रीमंगले या दोघांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. अाणि या दोन्ही मुलांचे प्राण त्याने वाचविले. मात्र ओम विजय मठपती या मुलाचे प्राण त्याला वाचविता आले नाही.
दोन मुलांचे जीव वाचविणाऱ्या कामेश्वर वाघमारे च्या धाडसी कार्यामुळे पंचक्रोशीत व सोशल मिडियावर त्याचे कौतुक होत आहे. त्याच्या साहसाची व धाडसाची नोंद घेऊन तालुका प्रशासनाने परिपूर्ण असा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर प्रस्तावित करावा. तसेच महाराष्ट्र शासनाने विहित नमुन्यात प्रस्ताव तयार करुन केंद्र शासनाकडे पाठवावा. सतत पाठपुरावा करून कामेश्वर वाघमारे या मुलांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार घोषित करावा.आणि यथोचित गौरव करण्यात यावा,अशी मागणी स्वच्छतादूत तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश्वर कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे कंधार तहसिलदार मार्फत केली आहे.
या निवेदनावर मुरलीधर थोटे, सय्यद हबीब, वैजनाथ गिरी, चंंद्रकांत ढवळे, माधव कदम, कैलास मामडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी, पांडुरंग बोरगावकर, पोलीस निरीक्षक विकास जाधव आदींना पाठविण्यात आल्या आहेत.
स्वच्छतादूत तथा पत्रकार प्रा.राजेश्वर कांबळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे व नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची लोहा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन दोन मुलांचे जीव वाचविणाऱ्या कामेश्वर वाघमारे या बालकास ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’ देण्याची मागणी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा